आप-कांग्रेसच्या आघाडीमुळे दिल्लीतील समिकरणं बदलली, भाजपाची वाट अवघड? असं आहे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 02:21 PM2024-02-23T14:21:39+5:302024-02-23T14:22:53+5:30
Lok Sabha Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची गाडी रुळावर येताना दिसत आहे. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याने इंडिया आघाडीचं बळ वाढलं आहे. दोन्ही पक्षांमधील वाटाघाटींनुसार दिल्लीमध्ये आप ४ आणि काँग्रेस ३ जागांवर लढण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता दिल्लीत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने येथील लोकसभेच्या ७ जागांचं गणित बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भाजपाने दिल्लीत ५६.९ टक्के मतं मिळवताना सर्वच्या सर्व सातही जागांवर कब्जा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला २२.६ आणि आम आदमी पक्षाला १८.२ टक्के मतं मिळाली होती. याची एकत्रित बेरीज ही ४०.८ टक्के होते. ती भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा खूप कमी होती. दिल्लीतील ७ पैकी ५ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस तर २ मतदारसंघामध्ये आप दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता २०२४ मध्येही मतदारांनी अशाच प्रकारे मतदान केल्यास काँग्रेस आणि आप एकत्र आले तरी त्याचा भाजपावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच आप आमि काँग्रेसला २०१९ प्रमाणे एकही जागा मिळणार नाही.
मात्र जर दिल्लीतील मतदारांनी २०१४ प्रमाणे मतदान केल्यास भाजपाची वाट अवघड होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सगळ्या जागा जिंकल्या असल्या तरी त्यावेळी भाजपाला ४६.६ टक्के मतं मिळाली होती. आप ३३.१ टक्के मतांसह दुसऱ्या आणि १५.२ टक्के मतांसह काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आप आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ही ४८.२ एवढी होती. आताही अशाच प्रकारे मतदान झाल्यास भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागू शकते.
२०१४ मध्ये केवळ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची बेरीज ही आप आणि कांग्रेसच्या उमेदवारांनी मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होती. तर उर्वरित ६ मतदारसंघांत भाजपाच्या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा आप आणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांची बेरीज अधिक होती.