लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच काँग्रेसचा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची प्रकृती बिघडली असून, प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना मध्य प्रदेशचा सटणा दौरा रद्द करावा लागला आहे. आता राहुल गांधी यांच्या ऐवजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सटणाच्या दौऱ्यावर जातील. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सांगितले की, राहुल गांधी हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज सटणा येथे येऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सटणा येथे दौरा करण्याची विनंती केली आहे. आता सटणा येथील काँग्रेस उमेदवार सिद्धार्थ कुशवाहा यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभेला मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या लवकरच राज्यात प्रचारसभा होणार आहेत. तसेच ते जनतेशी संवाद साधणार आहेत.
काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रभारी जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राहुल गांधी आज सटना आणि रांचीमध्ये प्रचारासाठी जाणार होते. तिथे इंडिया आघाडीची सभा होणार आहे. मात्र राहुल गांधी हे अचानक आजारी पडले आहेत. तसेच सध्या ते दिल्लीमधून बाहेर जाऊ शकत नाहीत. मात्र राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सटना येथे सभेला संबोधित करणार आहेत.
मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्पातील मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी सटना येथे मतदान होणार आहे. तिथेच प्रचारसभेसाठी राहुल गांधी हे येणार आहेत. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द करावा लागला आहे. याआधी राहुल गांधी यांनी ८ एप्रिल रोजी मंडला आणि शहडोल येथे प्रचारसभा घेतल्या होत्या.