मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं. प्रचारसभेत भाषण करत असताना उकाडा सहन न झाल्याने राहुल गांधी यांनी भरसभेत पाण्याची बाटली डोक्यावर ओतून उकाड्यापासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे प्रचारसभेसाठी आले असताना ही घटना घडली. तिथे भाषण देत असताना खूप गरमी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर त्यांनी पाण्याची संपूर्ण बाटली डोक्यावर रिकामी केली.
सध्या देशातील काही राज्यांत भीषण उन्हाळा सुरू आहे. तर सर्व नेते हे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. मात्र भीषण उन्हाळ्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सरासरी तापमानापेक्षा ८ डिग्री अधिक तापमानाची नोंद होत आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते उकाड्यापासून वाचण्याचा सल्ला लोकांना देत आहेत.
दरम्यान, उकाड्याने हैराण झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परमात्मा विधानावरून घणाघाती टीका केली. त्यांनी सांगितले की, इतर सर्व जण बायोलॉजिकल आहेत. मात्र नरेंद मोदी हे बायोलॉजिकल नाही आहेत. त्यांना त्यांच्या परमात्माने अंबानी आणि अदानी यांची मदत करण्यासाठी पाठवलं आहे. मात्र परमात्माने त्यांना शेतकरी आणि मजुरांची मदत करण्यासाठी पाठवलेलं नाही.
राहुल गांधी म्हणाले की, जर परमात्म्याने असं केलं असतं तर त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांची मदत केली असती. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते म्हणाले की, हे नरेंद्र मोदीवाले परमात्मा आहेत. काही चमचे मोदींसोबत बसून त्यांना प्रश्न विचारतात. तुम्ही आंबा कसा खाता, धुवून खाता की सोलून खाता, असले प्रश्न विचारतात. त्यावर मोदी मी काही करत नाही, सारं आपोआप होतं, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
जर मोदींना परमात्म्याने मोदींना पाठवले असते तर परमात्म्याने त्यांना देशातील सर्वात गरीब लोकांची मदत करा, असे सांगितले असते, शेतकऱ्यांची मदत करा, असे सांगितले असते. मात्र मोदींच्या परमात्म्याने त्यांना अंबानींची मदत करा, अदानींची मदत करा, असे सांगितले. अंबानी-अदानीचे १६ लाख कोटी माफ करा, असे सांगितले. हे कसले परमात्मा आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.