लोकसभेपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:19 PM2024-03-18T15:19:32+5:302024-03-18T15:20:06+5:30
6 राज्यातील गृहसचिवांसह बंगालचे डीजीपी आणि महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांसाठी आयोग सातत्याने पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश-बिहारसह 6 राज्यांच्या गृहसचिवांना पदावरुन हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासन विभागातील सचिवा आणि पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये समतोल राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. आयोगाने सर्व राज्य सरकारांना निवडणूक कामाशी संबंधित अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा सध्या त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये तैनात आहेत.
EC orders removal of Home Secretaries in six states to ensure fair elections
— ANI Digital (@ani_digital) March 18, 2024
Read @ANI Story | https://t.co/8lc8AyQzy4#ECI#ElectionCommission#LokSabhaElections2024#GeneralElections2024pic.twitter.com/STangqj2PS
आयोगाची महाराष्ट्रावर नाराजी
महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांबाबत आयोगाच्या सूचनांचे पालन केलेले नाही. याबाबत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने मुख्य सचिवांना महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले असून, त्यासंबंधीचा अहवाल आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देण्यास सांगितले आहे.
18व्या लोकसभेसाठी 19 एप्रिलपासून मतदान
2024 च्या लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर, या निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होईल.