मध्य प्रदेशातील बालाघाट येथील माजी खासदार कंकर मुंजारे यांना त्यांच्या पत्नीने वनवासात पाठवलं आहे. आपल्या व्यथा मांडताना मुंजारे म्हणाले की, भगवान श्रीरामाला कैकयीमुळे 14 वर्षे वनवासात जावं लागलं पण मला आता माझ्या पत्नीमुळे 14 दिवस वनवासात जावं लागत आहे. कंकर मुंजारे हे बालाघाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
आपल्या विधानांमुळे आणि राजकीय कृतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बालाघाटमधील बसपाचे उमेदवार कंकर मुंजारे यांना सोमवारी बालाघाटमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपलं घर सोडल्याबाबत मोठं विधान केलं आहे. "भगवान श्रीरामांना कैकयीमुळे 14 वर्षे वनवासात राहावं लागले, आता माझी पत्नी अनुभामुळे मला 14 दिवस वनवासात राहावे लागत आहे" असं मुंजारे यांनी सांगितलं.
5 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कंकर मुंजारे हे घर सोडून गेले होते आणि ते गांगुल पारा टेकडी येथील त्यांच्या फार्म हाऊसवर राहायला गेले. त्यांना या वनवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मी अनुभा यांना आधीच सांगितलं होतं की, तुम्ही काँग्रेसच्या आमदार आहात तर तुमच्याकडे पक्षाशी संबंधित जबाबदाऱ्याही असतील."
"तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जा आणि तिथून काँग्रेससाठी काम करा, मी इथूनच माझ्या निवडणुकीची कामे करेन, पण त्या यासाठी तयार झाल्या नाहीत. एकाच घरातून दोन राजकीय विचारधारेवर काम करणं हे माझ्या तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी माझं घर सोडलं आणि फार्म हाऊसमध्ये राहायला आलो" असं देखील कंकर मुंजारे यांनी म्हटलं आहे.