‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:06 AM2024-05-01T09:06:55+5:302024-05-01T09:07:49+5:30
Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम हे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता विरोधी उमेदवारांवरच कब्जा केला जात आहे, अशी टीका जितू पटवारी यांनी केली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडूनभाजपाला कडवी टक्कर मिळत आहे. मात्र गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दोन मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनाच आपल्या पक्षात खेचत भाजपाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम हे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता विरोधी उमेदवारांवरच कब्जा केला जात आहे, अशी टीका जितू पटवारी यांनी केली आहे.
भाजपावर घणाघाती टीका करताना जितू पटवारी म्हणाले की, सध्या देशात राजकीय माफिया फोफावत आहेत. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता विरोधी उमेदवारांवरच कब्जा केला जात आहे. इंदूरमध्ये जे काही घडले ते कलंकित करणारे आहे. जितू पटवारी यांनी याआधीही अक्षय बम यांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने इंदूर लोकसभा मतदारसंघातून अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपामध्ये प्रवेस केला होता.
अक्षय बम यांनी याआधी कुठलीही निवणडणूक लढवलेली नव्हती. त्यांच्यावर तीन वेगवेगळे खटले सुरू आहेत. बम यांनी शपथपत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता. तसेच बम यांनी त्यांची एकूण संपत्ती ५७ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. व्यावसायिक असलेल्या बम यांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न २.६३ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.
इंदूर लोकसभा मतदारसंघामधून एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील ९ उमेदवारांनी आपलं नाव मागे घेतलं होतं. त्यामुळे आता इंदूर लोकसभेसाठी १४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.