बलवंत तक्षक
चंडीगड : माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी देवीलाल यांच्या कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यापैकी ३ सदस्य विविध पक्षांच्या तिकिटांवर एकमेकांच्या विरोधातच उभे आहेत. त्यामुळे हरयाणामध्ये घराणेशाहीची जोरदार चर्चा आहे.
देवीलाल यांचे पुत्र चौधरी रणजित सिंह भाजपच्या तिकिटावर हिसार येथून लढत आहेत. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याच सुना नैनाचौटाला आणि सुनयना चौटाला यांच्याचविरोधात त्यांची लढत आहे. नैना या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत. त्या जजपाच्या तिकिटावर लढत आहेत. त्यांचे पुत्र हरयाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे हिसारमधून खासदार होते.
रणजित सिंह यांची दुसरी नातसून सुनयना यांना माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या 'इनेलो' पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्या रणजित सिंह यांचे भाऊ दिवंगत प्रतापसिंह चौटाला यांच्या मुलाची पत्नी आहेत. त्या प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
नातूदेखील रिंगणात
देवीलाल यांचे नातू अभयसिंह चौटाला हे 'इनेलो'च्या तिकिटावर कुरुक्षेत्र येथून लडत आहेत. त्यांचा मुकाबला भाजपचे नवीन जिंदाल आणि 'आप'चे हरयाणा प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांच्याशी आहे.