आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:10 PM2024-04-12T19:10:13+5:302024-04-12T19:11:34+5:30
भाजप सरकार संविधान संपवण्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत असते.
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. या प्रत्येक सभेतून ते विरोधकांवर सातत्याने टीका करत आहेत. शुक्रवारी(दि.12) त्यांनी राजस्थानच्या बारमेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेबाबतही विरोधकांना फैलावर घेतले.
भारताला शक्तिहीन बनवण्यासाठी आघाडी
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप दिसते. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आणखी एका पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात देशाविरोधात घोषणा केली. ते भारताची अण्वस्त्रे नष्ट करू इच्छितात. आपले दोन शेजारी अण्वस्त्रांनी सज्ज असताना आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत? ही कोणती आघाडी आहे, जी भारताला शक्तीहीन बनवू इच्छिते...तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहात? हे लोक देशाच्या सीमावर्ती गावांना देशाची शेवटची गावे म्हणतात. त्यांनी जाणीवपूर्वक सीमावर्ती जिल्हे व गावे विकासापासून वंचित ठेवली. सीमाभाग आणि सीमावर्ती गावांना आम्ही शेवटची गावे मानत नाही, तर देशातील पहिली गावे मानतो. आमच्यासाठी देशाच्या सीमा इथे संपत नाहीत, आमच्यासाठी देश इथून सुरू होतो, असेही मोदी म्हणाले.
"Even if BR Ambedkar himself comes & demands the change of constitution, it won't happen. This government treats the constitution as it treats Geeta, Bible & Quran."
— DrVinushaReddy(Modi ka Pariwar) (@vinushareddyb) April 12, 2024
PM @narendramodi ji blasts Congress over their misinformed attack of BJP wanting to change the constitution. pic.twitter.com/eEIysk1Sey
रामायण-कुराण हे आमच्यासाठी संविधान
सरकार संविधान बदलणार, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होते. यावरुनही मोदींनी टीका केली. पीएम मोदी म्हणाले, 400 पारची चर्चा होत आहे, कारण तुम्ही मला दहा वर्षे चांगले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे. तुम्ही संविधानाबाबत नेहमी खोटं बोलता. मी लिहून देतो की, स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले, तरीदेखील ते संविधान रद्द करू शकत नाहीत. आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान आहे. ही निवडणूक लोकशाही मजबूत करणारी निवडणूक आहे. काँग्रेसने देशावर 5 दशकांहून अधिक काळ राज्य केले, पण कोणत्याही समस्येवर योग्य तोडगा काढला नाही. काँग्रेसची विचारसरणी नेहमी विकासविरोधी राहिली आहे.
राष्ट्रहिताच्या कामाला काँग्रेसचा विरोध
ज्यांना काँग्रेसने कधीच विचारले नाही, त्या लोकांना मोदी विचारतो. आपल्या आदिवासी समाजातील मुलांच्या प्रगतीसाठी आम्ही एकलव्य मॉडेल निवासी शाळा उघडत आहोत. आदिवासी समाजाला सिकलसेल ॲनिमियापासून मुक्त करण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत. राष्ट्रहिताच्या प्रत्येक कामाला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस देशविरोधी असलेल्या प्रत्येक शक्तीसोबत उभी आहे. राम मंदिर उभारण्याचे पवित्र कार्य होते, काँग्रेस त्यावर बहिष्कार टाकते, राजस्थानमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक केली जाते आणि काँग्रेस दंगलखोरांना संरक्षण देते. घुसखोर देशात येतात, तेव्हा काँग्रेस त्यांचे स्वागत करते. भारताच्या फाळणीला विरोध करणाऱ्या दलित आणि शीख बांधवांना नागरिकत्व देणाऱ्या CAA ला त्यांचा विरोध आहे. ही नेमकी कोणती आघाडी आहे, जी देशविरोधी काम करते, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.