भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 04:58 PM2024-04-07T16:58:05+5:302024-04-07T16:58:30+5:30
Lok Sabha Election 2024: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबात मोठा दावा केला आहे.
Prashant Kishor on INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप '400 पार'चा नारा देत आहेत, तर काँग्रेस भाजपची सत्ता उलथून लावण्याचा दावा करत आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे येत्या 4 जुनला कळेलच. पण, तत्पुर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.या दाव्यामुळे भाजपवाले नक्कीच खुश होतील. भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतात मोठा फायदा मिळेल, या भागांत भाजपची व्होट बँक वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.
बंगालमध्येही भाजप नंबर 1 चा पक्ष बनेल
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर म्हणाले, विरोधकांना भाजपचा विजयरथ रोखण्याच्या अनेक संधी होत्या, परंतु चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी सर्व संधी गमावल्या. भाजप तेलंगणातील पहिला किंवा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, ही मोठी गोष्ट आहे. भाजप ओडिशातही जास्तीत जास्त जागा जिंकेल. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप क्रमांक एकचा पक्ष होण्याची दाट शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही भाजपची मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत, परंतु या भागांमध्ये भाजपला 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या भागात 29 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजप 370 जागा जिंकू शकत नाही, त्यांनी फक्त निवडणुकीसाठी एक लक्ष्य ठेवले आहे.
राहुल गांधींवर टीका
भाजपने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मोदी आणि अमित शहा यांसारखे भाजप नेते वारंवार या राज्यांना भेट देत आहेत. दुसरीकडे, या राज्यांमध्ये विरोधकांनी फारच कमी प्रयत्न केले. गेल्या पाच वर्षात तमिळनाडूतील निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी राज्यांना दिलेल्या भेटींची संख्या मोजली तर पंतप्रधानांच्या दौऱ्यासमोर राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही विरोधी नेत्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त आहेत. राहुल गांधींवर टीका करताना किशोर म्हणाले की, तुमची लढाई उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आहे, पण तुम्ही मणिपूर आणि मेघालयला भेट देत असाल तर तुम्हाला यश कसे मिळेल.
जगन मोहन रेड्डींचे पुनरागमन अवघड
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याबाबत प्रशांत किशोर म्हणाले, जगन मोहन रेड्डी यांना पुनरागमन करणे कठीण जाईल. त्यांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी किंवा राज्याच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी काहीही केले नाही. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनीच जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी 2014 मध्ये काम केले होते. यानंतर 2019 मध्ये YSRCPने तेलुगु देसम पक्षाचा (टीडीपी) पराभव केला.