UP नंतर दिल्लीतून ‘इंडिया’ला खूशखबर, AAP- काँग्रेसमधील आघाडी पक्की, दोघेही एवढ्या जागांवर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 01:13 PM2024-02-22T13:13:50+5:302024-02-22T13:14:10+5:30
Lok Sabha Election 2024: काल उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवाटपामध्ये जागावाटपाबाबत एकमत होऊन आघाडी पक्की झाल्यानंतर आता दिल्लीमधूनही ‘इंडिया’साठी खूशखबर आली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये दिल्लीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत एकमत झालं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काही पक्षांनी आणि बड्या नेत्यांनी साथ सोडल्याने अडखळलेली विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची गाडी आता रुळावर येताना दिसत आहे. काल उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवाटपामध्ये जागावाटपाबाबत एकमत होऊन आघाडी पक्की झाल्यानंतर आता दिल्लीमधूनही ‘इंडिया’साठी खूशखबर आली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्येदिल्लीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत एकमत झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आप ४ तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जागावाटपाला होत असलेल्या विलंबामुळे अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली आहे.
सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप यांच्यातील आघाडीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. अखेर गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झालं आहे. सूत्रांच्या मते दिल्लीतील लोकसभेच्या ४ जागांवर आम आदमी पक्ष निवडणूक लढू शकतो. तर लोकसभेच्या तीन जागा काँग्रेसला देण्यात येतील. सध्या दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. विधानसभेत आम आदमी पक्षाचा मोठा विजय होत असला तरी दिल्लीतील मतदार २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या मागे उभे राहिले होते. त्यामुळे यावेळी एकत्र लढून भाजपाला रोखण्याचा आप आणि काँग्रेसचा इरादा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीच्या राजकारणात आप आणि काँग्रेस हे एकमेकांचे विरोधी पक्ष होते.
आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील जागावाटपाबाबत सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार आप नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरवणार आहे. तर काँग्रेस पूर्व दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली आणि चांदनी चौकमध्ये आपले उमेदवार उतरवणार आहे. त्याबरोबरत आम आदमी पक्ष गुजरातमधील भरूच आणि भावनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देईल. त्याशिवाय हरियाणामधील एका मतदारसंघातून उमेदवार देणार आहे. तर चंडीगडचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात येईल.