"पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर..."; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:32 AM2024-05-22T11:32:37+5:302024-05-22T11:33:47+5:30
Kangana Ranaut, Lok Sabha Election 2024: मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाची अधिकृत उमेदवार आहे.
Kangana Ranaut, Lok Sabha Election 2024: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा जागेसाठी मतदानाची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे प्रचारालाही धार पाहायला मिळत आहे. भाजपाची अधिकृत उमेदवार अभिनेत्री कंगना रणौतने काँग्रेसचे प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंग यांना 'बिघडलेला राजकुमार' म्हणत चपराक लगावली आहे. एका सभेत तो म्हणाला, 'विक्रमादित्य, तुला लाज वाटायला हवी. आज तुझे वडील इथे असते तर त्यांनी तुला कानाखाली लगावली असती आणि माफी मागायला सांगितली असती. या पहाडी मुलीने एक चपराक लगावली तर तुला भाज्यांचे रेट विचारायचाही विसर पडेल' असे कंगनाने सुनावले.
"कदाचित त्याच्या आईने त्याला महिलांचा आदर करायला शिकवले नाही. विक्रमादित्य सिंग हे सहा वेळा राज्याचे मुख्यमंत्री असलेले वीरभद्र सिंह आणि मंडीच्या खासदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांचा मुलगा आहेत. विक्रमादित्य म्हणाले होते की, कंगनाने ज्या-ज्या मंदिरांना भेट दिली आहे, त्या मंदिरांचे शुद्धीकरण करावे लागेल. तसेच हिमाचलच्या मुलींचे रेट काय, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते. त्यावर कंगनाने समाचार घेतला.
"विक्रमादित्य माझ्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी बोलला. हिमाचलमधील मुलींचे दर काय आहेत, असा सवालही काँग्रेसच्या लोकांनी केला. मी त्यांना सांगून ठेवते की पहाडी मुलींच्या हातात खूप शक्ती आहे. हे जे चंपू आहेत ते समोर दिसले तर पहाडी मुलींची एक चपराक बसेल. मग मुलींचे सोडा, भाज्यांचे भाव विचारायचे विसरतील," असे कंगना ठणकावून सांगितले.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागांवर १ जून रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेनंतर रिक्त झालेल्या सहा विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. कंगना रणौतला लाहौल-स्पितीच्या काझामध्ये स्थानिक लोक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. त्याबाबत भाजपच्या हिमाचल प्रदेश युनिटने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना इतक्या जवळ सभा घेण्याची परवानगी कशी देण्यात आली? अशी तक्रार त्यात करण्यात आली आहे.