आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. जर नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर देशातील परिस्थिती निराशाजनक असती असं म्हणत निशाणा साधला आहे. राज्याच्या बारपेटा येथील निवडणूक रॅलीदरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे.
'इंडिया टुडे' या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, हिमंता बिस्वा सरमा यांनी रॅलीला संबोधित करताना मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. सरमा यांनी कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात लसी आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नसते तर देशातील परिस्थिती गंभीर होऊ शकली असती असं म्हटलं आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी मोदी सरकारचं भरभरून कौतुक केलं. 2014 नंतर बोडो आणि कार्बी आंदोलनांमध्ये घट झाली, त्यामुळे प्रादेशिक मुद्द्यांमध्ये प्रगती झाली. याचे श्रेय केंद्रीय नेतृत्व आणि मोदी सरकारला जाते. महिला बचत गटांना जिओ टॅगिंगचे काम सोपवण्याची योजना त्यांना अधिक सक्षम करेल असं देखील सांगितलं आहे.
चार जागांसाठी होणार मतदान
आसाममध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 10 जागांवर मतदान झाले आहे. उर्वरित चार जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यात गुवाहाटी, बारपेट, कोक्राझार आणि धुबरी या जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपाने नऊ जागा जिंकल्या होत्या.