लोकसभा निवडणुकीसाठीचं सहा टप्प्यामधील मतदान आटोपलं असून, १ जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे. योगी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हाच भाजपा ३७० आणि एनडीए ४०० जागा पार करणात अशी घोषणा देण्यात आली होती. सध्या सर्वसामान्य जनमानसामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार आणि ‘अब की बार ४०० पार’ अशी भावना आहे. आता ४ जून रोजी जेव्हा निकाल येतील तेव्हा एनडीएने ४०० जागा जिंकलेल्या असतील, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, मागच्या १० वर्षांमध्ये विकासाचे नवे मॉडेल मोदींच्या नेतृत्वाखाली समोर आले आहे. लोककल्याणकारी योजना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम झालं आहे. त्यामुळे ४ जून रोजी जेव्हा निकाल लागेल, तेव्हा भाजपा ३७० आणि एनडीए ४०० जागा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारंवार सांगायचे की, धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये. एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कापून त्यातील काही लाभ हा अल्पसंख्याकांना आणि विशेषकरून मुस्लिमांना देण्यासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले. काँग्रेसच्या आंध्र प्रदेश सरकार आणि कर्नाटक सरकारने ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांमध्ये वाटण्याचं काम केलं आहे.
योगी पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी घटनेची सर्वाधिक खिल्ली उडवली आहे. समाजवादी पक्षाने २०१२ च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामधून मुस्लिमांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही बिहारमध्ये मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय बदलत राज्य सरकारला चपराक दिली आहे. तसेच धर्माच्या आरक्षणावर देता येत नाही, असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे, असे योगी म्हणाले.