Rahul Gandhi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले, यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी झालेल्या इंडिया अलायन्सच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माध्यम प्रतिनिधींनी इंडिया आघाडीला किती जागा मिळणार असा प्रश्न विचारला. यावेळी राहुल गांधी यांनी तुम्ही सिद्धू मूसवालाचे गाणे ऐकले आहे का? असं म्हणाले.
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे भाकीत फेटाळून लावले. "हा एक्झिट पोल नाही, हा मोदींचा मीडिया पोल आहे, असा टोला लगावला. हा त्यांचा फँटसी पोल आहे. तुम्ही सिद्धू मूसवालाचे २९५ गाणे ऐकले आहे का? असा सवाल केला.
याआधी शनिवारीही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा केला होता. नेत्यांशी आणि जनतेत चर्चा झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला होता. त्यामुळे यावेळी इंडिया आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असंही खरगे म्हणाले.
शनिवारी रात्री जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधील सर्व प्रमुख सर्वेक्षणांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवला आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा एकदा ३०० जागांचा आकडा पार करतील असा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांमध्ये फायदा वर्तवला आहे.
काल एक्झिट पोलचा अंदाज आले समोर
इंडियाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.
भाजपला ३११ जागा तर काँग्रेसला ६३ जागा मिळतील. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला १०९ ते १३९ जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला ३६२ ते ३९२ व इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे.