लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर, आता हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवर तथा बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतने आज (सोमवार) पलटवार केला आहे. तसेच आपण बीफ आणि रेड मीट खात नसल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात, कंगनाने सोशल मीडिया एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही. माझ्या बाबतीत पूर्णपणे तथ्यहीन अफवा पसरवली जात आहे, हे लज्जास्पद आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून योगिक आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रचार करत आहे. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी असली रणनीती कामी येणार नाही. कारण लोक मला जाणतात की, मी एक अभिमानी हिंदू आहे आणि कुठलीही गोष्ट त्यांची दिशाभूल करू शकत नाही. जय श्री राम."
काय म्हणाले होते वडेट्टीवार? - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभेचे तिकीट मिळाल्यापासूनच काँग्रेस नेते तिच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. यातच, आपल्याला बीफ आवडते आणि आपण खातो, असे जीने सोशल मीडियावर लिहिले होते, अशा कंगना रणौतला भाजपने तिला तिकीट दिले आहे. असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यानी केला होता.