'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 08:18 PM2024-05-30T20:18:08+5:302024-05-30T20:18:51+5:30
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर दिल्याने सध्या इंडिया आघाडीचे नेते उत्साहात आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून मतदारांचा कौल इंडिया आघाडीला मिळेल अशी या नेत्यांना अपेक्षा आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर दिल्याने सध्या इंडिया आघाडीचे नेते उत्साहात आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून मतदारांचा कौल इंडिया आघाडीला मिळेल अशी या नेत्यांना अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन होईल, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे. तसेच केंद्रामध्ये सरकार आल्यावर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या गॅरंटी आणि न्यायपत्रामधील घोषणा पूर्ण केल्या जातील, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान कोण होईल, याबाबत विचारलं असता मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबत आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि सर्व पक्षांच्या सहमतीने मुख्यमंत्री निवडला जाईल, अशी माहिती दिली.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ४ जून रोजी जनता एक नवं पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश देईल. त्यात इंडिया आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल. यावेळी ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असं विचारलं असता खर्गे म्हणाले की, मी माझ्यासाठी काहीही मागितलेलं नाही. काँग्रेसने १ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. ही एक अनौपचारिक बैठक असेल. तसेच त्यामध्ये फॉर्म १७सी आणि मतमोजणीच्या तयारीबाबत चर्चा होईल, असेही खर्गे यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, ही निवडणूक कायम लक्षात ठेवली जाईल. जात-धर्म-वर्ग सोडून संपूर्ण देश हा राज्यघटना वाचवण्यासाठी पुढे आला. आम्ही विविध मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ दिवसांच्या भाषणामध्ये २३२ वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. ५७३ वेळा इंडिया आघाडीचं नाव घेतलं. मात्र बेरोजगारीबाबत ते चकार शब्द बोलले नाहीत. यादरम्यान मोदींनी ४२१ वेळा मंदिर-मशीद आणि २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.