यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर देताना दिसत आहे. मात्र प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचं भविष्य आणि सुधारणेसाठीच्या संभाव्य मार्गांबाबत विचारण्यात आले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जेव्हा आपल्यामध्ये काही तरी उणीव आहे आणि सुधारणेची गरज आहे, अशी जेव्हा एखाद्याला जाणीव होते, तेव्हाच सुधारणा होऊ शकते. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये मानसिक अज्ञान, बौद्धिक आळ आणि अहंकार भरलेला आहे. तसेच पक्ष अजूनही याच पद्धतीने मार्गाक्रमण करत आहे.
याबाबत सविस्तरपणे बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, हे असं आहे की, आपण योग्य मार्गावर आहोत, असं एखाद्याला वाटतं, मात्र ते काय करत आहेत हेच त्यांना बऱ्याचदा समजत नाही. काँग्रेसच्या सद्यस्थितीमागे आणखी एक शक्यता आहे ती म्हणजे भारतीय राजकारणात सध्या काय चाललंय आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करण्याची आवश्यक आहे, हेच त्यांना माहिती नाही आहे, असं परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये अज्ञानता, आळस आणि अहंकार यांचं एकत्रिकरण झालं आहे. लोक त्यांना मत का देत नाही आहेत, हेच काँग्रेसला कळत नाही आहे. दुसरी बाब म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला हे समजत आहे मात्र ते एवढे आळशी आहेत की ते सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर तिसरी बाब म्हणजे काँग्रेसमधील अहंकार असू शकतो. त्यामुळे लोक सध्या आपल्याला मतदान करत नसतील, तरी कधी ना कधी लोकांना आपल्या चुकीची जाणीव होईल आणि शेवटी ते काँग्रेसला मतदान करतील, असं काँग्रेसला वाटत आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केला.