'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभा २०२४ साठी मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 06:10 PM2023-12-08T18:10:25+5:302023-12-08T18:10:53+5:30
काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकांसाठी कामाला लागले आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवून भाजपाने लोकसभेची सेमी फायनल जिंकली. अशातच काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. दरम्यान, पंजाबकाँग्रेसने आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांच्यासोबत पक्षाचे नेते राजा वाडिंग यांच्या चंदीगड येथील घरी बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. आगामी लोकसभेसाठी आघाडीसोबत जाण्यास आपण तयार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी हरीश चौधरी यांच्या कानावर घातले.
काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या रणनीतीवर चर्चा केली. काँग्रेस राज्यातील सर्व १३ जागा स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या बैठकीत राजा वाडिंग यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा, सुखजिंदर रंधवा, परगट सिंग यांचीही उपस्थिती होती. खरं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता असून 'आप' इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे.
काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार
पंजाबमधील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी आम्हाला पंजाबमध्ये कोणत्याही आघाडीची गरज नसल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीत असून स्वबळावर आम्ही मैदानात उतरू. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सरकारशी लढण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये आमची कोणावरही विश्वासार्हता नाही आणि आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आल्याचे पंजाब काँग्रेसच्या प्रभारींनी सांगितले.
तेलंगणा वगळता काँग्रेसच्या हाती निराशा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती, मात्र तेथील जनतेने आपली परंपरा कायम राखत अपेक्षेप्रमाणे सत्ताबदल केला आणि सत्तेच्या चाव्या भाजपाकडे सोपवल्या. मात्र, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजपाला सत्ता कायम राखण्यात यश आले. छत्तीसगडच्या निकालाने मात्र राजकीय पंडितांना देखील धक्का दिला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. पण, तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआर यांच्या पक्षाचा पराभव करत सत्ता काबीज केली.