Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, दिग्गज नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवार नाना युक्त्या वापरत असतात. पण, सध्या एका पोपटाने केलेल्या भविष्यवाणीने उमेदवाराचा आनंद द्विगुणित झाला पण पोपटाचा मालक मात्र अडचणीत आला.
दरम्यान, तामिळनाडूमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील कुड्डालोर मतदारसंघातील एक अजब घटना सर्वांचे लक्ष वेधत आहे. येथे भविष्य सांगणाऱ्या पोपटामुळे त्याच्या मालकाच्या अडचणी वाढल्या. खरं तर लोकांचे भविष्य सांगणाऱ्या या पोपटाने पट्टाली मक्कल काची पार्टीचे (पीएमके) उमेदवार विजयी होणार असल्याचा कौल दिला. पोपटाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित पोपटाच्या मालकाला ताब्यात घेतले. मग त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
पोपटाची भविष्यवाणी वृत्तसंस्था 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट दिग्दर्शक थंकर बच्चन हे कुड्डालोर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पीएमकेच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. यावेळी ते निवडणूक प्रचारासाठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना ते परिसरात फिरत होते. समर्थकांशी संवाद साधताना त्यांना एका मंदिराजवळ एक पोपट दिसला. हा पोपट लोकांसमोर ठेवलेले कार्ड निवडून भविष्य सांगत असल्याचे बच्चन यांच्या निदर्शनास आले.
पोपटाला पाहताच थंकर यांनी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्या दिशेने कूच केली. तेव्हा पोपट पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्याने समोर ठेवलेले एक कार्ड उचलून बाजूला ठेवले. त्यावर तेथील देवतेचा फोटो होता. कार्ड पाहून पोपटाच्या मालकाने निवडणुकीत थंकर बच्चन यांनाच यश मिळेल असा दावा केला. पोपटाने वर्तवलेल्या भविष्यवाणीवर थंकर यांनी आनंद व्यक्त करत त्याला खायला दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोपटाचा मालक सेल्वराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले.