लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळालं. मात्र मागच्या दहा वर्षांपासून स्वबळावर सरकार चालवणाऱ्या भाजपाचं बहुमत हुकल्याने नव्या सरकारच्या स्थापनेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपा आणि एनडीएमधील घटक पक्षांकडून आजच सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दरम्यान, आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी मागच्या सरकारचा कार्यकाळ, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या घटना आणि भविष्यातील योजना याबाबतत सविस्तर भाष्य केलं. यावेळी मोदींनी एनडीएमधील घटक पक्षांच्या नेत्यांचा आवर्जुन उल्लेख केला. त्यात त्यांनी अभिनेते आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांचंही विशेष कौतुक केलं.
आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतात भाजपा आणि एनडीएने मिळवेल्या यशाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, दक्षिण भारतातील आमच्या कामगिरी कामगिरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. आम्ही केरळमध्ये पहिल्यांदाच एक जागा जिंकली. तामिळनाडूमध्ये आम्ही खातं उघडू शकलो नाही. मात्र आम्ही लढत दिली. तर आंध्र प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. आमचे सहकारी चंद्राबाबू म्हणाले की, आंध्र प्रदेशमध्ये एवढा मोठा विजय आधी कुणालाही मिळाला नव्हता. दरम्यान, इथे मंचावर पवन कल्याणही दिसत आहेत. हे पवन नाहीत, तर वादळ आहे, असा कौतुकास्पद उल्लेखही नरेंद्र मोदी यांनी केला.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये एनडीएनं मोठं यश मिळवलं आहे. एनडीएनं आंध्र प्रदेशमधील लोकसभेच्या २५ जागांपैकी २१ जागा जिंकल्या आहेत. त्यात तेलुगू देसम पक्षाने १६, भाजपाने ३ आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने २ जागांवर विजय मिळवला आहे. तर आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये तेलुगू देसम पक्षाने १३५, जनसेना पक्षाने २१ आणि भाजपाने ८ जागांवर विजय मिळवला आहे.