लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीची लगबग सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे मात्र या बैठकीला अनुपस्थित आहेत.
आज संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीला अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह उपस्थित आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्ष ७ टप्प्यांमधील कामगिरीचं परीक्षण केलं जाणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यामध्ये इंडिया आघाडी यशस्वी ठरेल आणि स्वत: सरकार स्थापन करेल, असा विश्वास इंडिया आघाडीमधील नेत्यांकडून करण्यात येत आहे.