ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:05 PM2023-11-30T13:05:28+5:302023-11-30T13:08:29+5:30

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी याबाबतचे काही संकेत दिले आहेत.

lok sabha election 2024 india alliance prime minister post face is likely to be a congress mallikarjun kharge | ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

Lok Sabha Election 2024: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले असून, आता ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे देशाचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष पूर्णपणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज होतील, असे सांगितले जात आहे. विरोधकांच्या INDIA आघाडीतून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. असे असले तरी इंडिया आघाडीकडून एका ज्येष्ठ नेत्याला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून  पसंती दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काही संकेत दिल्याचे बोलले जात आहे. 

भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली. याच्या काही बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेस नेते तसेच खासदार राहुल गांधी यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. ममता बॅनर्जी यादेखील या स्पर्धेत येऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत 'इंडिया' आघाडीने उत्तम कामगिरी केली तर संभाव्य पंतप्रधानपदासाठी या आघाडीतील बहुतांश पक्ष व गांधी घराण्यासह काँग्रेसची पहिली पसंती कोण असेल, याचे अप्रत्यक्ष संकेत देण्यात आले. ते नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, असे म्हटले जात आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला सोनिया गांधींचा पाठिंबा?

एका महत्त्वाच्या वळणावर मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत, जेव्हा राज्यघटनेच्या मूल्यांशी देणेघेणे नसलेले सत्तेत असलेले लोक सर्व घटनात्मक संस्था, व्यवस्था आणि तत्त्वे मोडीत काढत आहेत. देशाच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठीच्या या ऐतिहासिक लढाईत ते काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वांत योग्य आहेत. म्हणूनच त्यांना माझा व काँग्रेसचा निःसंदिग्ध पाठिंबा आहे, असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या. यावरून मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते आणि त्यांना इंडिया आघाडीचा पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, सध्याच्या अत्यंत द्वेषपूर्ण व हिंसेच्या वातावरणात देशाला दिशा दाखवण्याची व सर्वांना जोडून पुढे जाण्याची जबाबदारी या ८१ वर्षीय जाणत्या नेत्याच्या खांद्यावर आली आहे, असा सूर माकप नेते सीताराम येच्युरी यांच्यासह अनेकांनी व्यक्त केला. तसेच देशात राज्यघटना व संसदीय लोकशाही दोन्ही धोक्यात आहेत. जे सत्तेत आहेत किंवा ज्यांचा आमची राज्यघटना, राष्ट्रध्वज, संसदीय लोकशाही सरकारवर विश्वासच नाही. या नवीन आव्हानांवर मात करण्यात आपण तेव्हाच यशस्वी होऊ जेव्हा आपले मतभेद सोडवून धैर्याने, धाडसाने एकत्र येऊ, असा संदेश मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वपक्षीय नेते व 'इंडिया' आघाडीचे नाव न घेता दिला.


 

Web Title: lok sabha election 2024 india alliance prime minister post face is likely to be a congress mallikarjun kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.