विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:00 PM2024-06-15T19:00:38+5:302024-06-15T19:02:58+5:30
Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता लोकसभेचे अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Lok Sabha ( Marathi News ) :लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन करण्यात टीडीपी आणि जेडीयू या पक्षांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता लोकसभेचे अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे असणार या चर्चा सुरू आहेत. टीडीपी'ने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे हे पद भाजपा आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षही लोकसभा अध्यक्षपदाची निवडणुकीत आपला उमेदवार देऊ शकते, असं बोलले जात आहे. यामुळे आता अध्यक्षपदावरुन सस्पेंन्स वाढला आहे.
Anna Hazare : अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही"
१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. २६ जून रोजी लोकसभा आपल्या नवीन सभापतीची निवड करेल. त्यामुळे विरोधी पक्षही सभापतींच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करू शकतात, असे बोलले जात आहे. विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद न दिल्यास ते अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देऊ शकतात. यासंदर्भातील अंतिम निर्णय संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी घेण्यात येऊ शकतो.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजी सुरू होईल आणि ३ जुलै रोजी संपेल. ९ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन खासदार शपथ घेतील. दरम्यान, राज्यसभेचे २६४ वे अधिवेशन २७ जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.
नवे खासदार शपथ घेणार
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाची ओळख करून देणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील आणि लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करतील. २३० हून अधिक सदस्यांसह विरोधी पक्षांची दीर्घकाळातील सर्वात मोठी ताकद आहे आणि लोकसभेत ९९ खासदार असलेला काँग्रेस आधीच शेअर बाजार घोटाळा आणि NEET परीक्षेतील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून सरकारवर हल्ला करत आहे. त्यामुळे संसदेचे आगामी अधिवेशन गदारोळात जाण्याची शक्यता आहे.