नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय प्रचारसभांच्या माध्यमातून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 'इंडिया' आघाडीच्या वतीने रविवारी दिल्लीत महारॅलीचे आयोजन केले आहे. त्यास प्रत्त्युत्तर म्हणून एनडीएकडूनही मेरठमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
रामलीलावर गुंजणार विरोधकांचा आवाज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीच्या रामलीला मैदानावर रविवारी 'लोकशाही वाचवा महारॅलीत 'इंडिया' आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडवणार आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता, तसेच हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
मेरठमध्ये देणार सत्ताधारी प्रत्युत्तरदिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने मेरठ येथे एनडीएच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद मोदी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला सुरुवात करतील. हा परिसर जाट व शेतकरी यांच्या आंदोलनांचा बालेकिल्ला मानला जातो.