कुस्तीपटू बजरंग पुनिया भाजपच्या वाटेवर? पैलवानाने दिले स्पष्टीकरण, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:20 PM2024-04-04T16:20:31+5:302024-04-04T16:23:29+5:30
Bajrang Punia News: बुधवारी बॉक्सर विजेंदर सिंगने भाजपमध्ये प्रवेश केला.
बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जात असल्याचे जाहीर केले. त्याने काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. विजेंदर सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे एक पत्रकाराने कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. संबंधित पत्रकाराच्या या पोस्टवर व्यक्त होताना पैलवानाने संताप व्यक्त केला. यावरून बजरंगने नाराजी व्यक्त केली. भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांमध्ये बजरंग पुनियाचा समावेश होता. दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या कालावधीपर्यंत पैलवानांनी धरणे आंदोलन केले होते. आखाड्याबाहेरील ही कुस्ती बराच काळ चालली. आंदोलनाचा एक भाग म्हणून पुनियाने त्याचा पद्म पुरस्कार परत केला होता. या आंदोलनावेळी त्यांना काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची साथ मिळाली होती.
एका पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हटले की, आता पुढचा नंबर बजरंग पुनियाचा आहे. या पोस्टवर व्यक्त होताना पुनियाने म्हटले, "पत्रकार महोदय, तुमची सूत्रे कुठेही पसरवू नका. कोणाबद्दलही काहीही चर्चा करण्याचा तुम्हाला परवाना नाही. कथा रचून स्वत:ला बाजारात आणणाऱ्या पत्रकारांना जनता गांभीर्याने घेणे थांबवत आहे."
पत्रकार महोदय अपने सूत्रों को न दौड़ाएँ. किसी के लिये गप हांकने का लाइसेंस आपको नहीं मिला है. अपने पास से बातें बना बना के मार्केट में लॉंच करने वाले पत्रकारों को जनता सीरियस लेना बन्द कर देती है. https://t.co/7j8aYUNkiA
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) April 4, 2024
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने सोशल मीडियावरून टीका करणारा ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी भाजपात प्रवेश केला. २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण, अचानक त्याने यू टर्न मारल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विजेंदरनेही विकासासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले. पण, जेव्हा पत्रकाराने त्याला या यू टर्नबाबत थेट प्रश्न विचारला, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर हास्यास्पद होते.
कालपर्यंत राहुल गांधींच्या बाजूने बोलणाऱ्या विजेंदरने अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले की, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याने प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी ज्याप्रकारे विकासाचे काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. ते जनतेचे हित पाहत आहेत. काल मी राहुल गाधींचा व्हिडीओ रिपोस्ट करून झोपी गेलो आणि जेव्हा जाग आली तेव्हा मनाला वाटले की मी चुकीचे करत आहे. तुम्ही चुकीच्या माणसासोबत आहे. तेव्हा वाटलं की BJP जॉइन करायला हवी.