2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे. मात्र, अजूनही काही जागा अशा आहेत की, जिथे पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशातील या दोन जागा एकेकाळी गांधी घराण्याच्या बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपाने विजय मिळवला. येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती, जिथून ते जिंकले होते. त्याचवेळी सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या, पण आता त्या राज्यसभा सदस्य आहेत. अशा स्थितीत दोन्ही जागा आता गांधी घराण्याच्या हातात राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच यावेळी या दोन जागांवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.
जयराम रमेश यांना विचारण्यात आले की, अमेठी-रायबरेली मतदारसंघातून उमेदवार कोण? याला उत्तर देताना ते म्हणाले की, उमेदवारांबाबत काँग्रेस निवडणूक समिती (सीईसी) निर्णय घेईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी अमेठी-रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस संघटनेलाही तेच हवे आहे. ते येथून निवडणूक लढवतील, अशी आशा आहे. राहुल गांधी यांनीही केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणात पक्षाच्या दारुण पराभवाबाबत काँग्रेस नेते म्हणाले की, हे वास्तवापासून दूर आहे. ते म्हणाले की, "देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याने संविधान धोक्यात आले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. 400 पार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी आहे. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, मात्र तरुण रोजगार आणि शेतकरी एमएसपीचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दहा वर्षांच्या अन्यायाला जनता कंटाळली आहे."
अलीकडच्या काळात अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसविरोधातही जोरदार वक्तव्य केले आहे. याबाबतच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडला आणि आता निष्ठेचा दाखला देण्यासाठी ते काँग्रेसविरोधात बोलत आहेत. जुन्या साथीदारांनी पक्ष सोडल्याने मन दु:खी झाले आहे, पण मनोधैर्य खचले नाही."