Narendra Modi : "जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका"; मोदींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:44 PM2024-04-12T12:44:49+5:302024-04-12T13:13:52+5:30
Narendra Modi And Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी उधमपूरला पोहोचले. याच दरम्यान मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरला त्यांचा राज्याचा दर्जा परत मिळेल आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील ही वेळ दूर नाही."
आगामी लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी उधमपूरला पोहोचले. याच दरम्यान मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरला त्यांचा राज्याचा दर्जा परत मिळेल आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील ही वेळ दूर नाही." भाजपाने उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं की, "कमकुवत काँग्रेस सरकारने शाहपूर कंडी धरण 10 वर्षे प्रलंबित ठेवलं. त्यामुळे जम्मूतील गावं कोरडी पडली होती. काँग्रेसच्या काळात रावीतून बाहेर पडणारे आमच्या हक्काचे पाणी पाकिस्तानात जात होते. जेव्हा लोकांना त्यांचं वास्तव कळलं, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये भ्रमाचं मायाजाळ चालणार नाही."
"10 वर्षात आम्ही दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली आहे आणि आता येत्या 5 वर्षांत या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. गेल्या 10 वर्षांत जम्मू-काश्मीर पूर्णपणे बदललं आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीरचं मन बदलत आहे."
#WATCH | J&K: Addressing a public rally in Udhampur, PM Modi says, "Modi thinks far ahead. So what has happened so far is just the trailer. I have to get busy in creating a new and wonderful picture of the new Jammu and Kashmir. The time is not far when Assembly Elections will be… pic.twitter.com/F8aHgialRA
— ANI (@ANI) April 12, 2024
जम्मू-काश्मीरमध्ये आता शाळा जाळल्या जात नाहीत, त्या बांधल्या जातात, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. त्यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. कलम 370 बाबत पंतप्रधान म्हणाले, "तुमच्या आशीर्वादाने मोदींनी 370 चा ढिगारा जमिनीत गाडला आहे. मी काँग्रेसला 370 परत आणण्याचं आव्हान देतो. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी 370 ची भिंत बांधण्यात आली."
ही निवडणूक म्हणजे देशात मजबूत सरकार बनवण्याची निवडणूक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. "एक मजबूत सरकार आव्हानांमध्ये काम करतं. आज गरिबांना मोफत रेशनची गॅरंटी आहे. 10 वर्षांपूर्वी काश्मीरमधील गावांमध्ये वीज, पाणी आणि रस्ते नव्हते. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे. आज तुमच्या आशीर्वादाने मोदींनी आपली गॅरंटी पूर्ण केली आहे. आज दहशतवाद, सीमेपलीकडून गोळीबार, दगडफेक हे या निवडणुकीचे मुद्दे नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा मोदी सरकार हाच आवाज येत आहे" असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.