"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:58 IST2024-05-02T13:57:10+5:302024-05-02T13:58:28+5:30
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. तिसऱ्या टप्प्यात मध्य प्रदेशातील लोकसभेच्या आठ जागांवर सात मे रोजी मतदान होणार आहे. याच दरम्यान, राजकीय पक्षांमधील राजकीय वादही शिगेला पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्याने जिथे काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील असं म्हटलं होतं.
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या 'जिथे एकही मत काँग्रेसला जाणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं करू' या विधानावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, "भाजपा लोकशाही, राज्यघटना आणि निवडणूक आयोगाला काहीही मानत नाही. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी."
"पूर्वी आपण बूथ कॅप्चरिंगबद्दल ऐकायचो आणि निवडणूक आयोग कारवाई करत असे. आता भाजपा उमेदवाराचे अपहरण करत असून निवडणूक आयोग गप्प आहे. 25 लाखांचा उल्लेख करणे हाच मोठा गुन्हा आहे, कैलाश विजयवर्गीय यांच्यावर तात्काळ बंदी घालावी."
यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी इंदूरमधून उमेदवारी माघार घेऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यावर जीतू पटवारी म्हणाले होते की, "पूर्वी बूथ कॅप्चर केले जात होते, आता फक्त उमेदवार पकडले जात आहेत. इंदूरमधील ही घटना काळीमा फासणारी आहे."
"सध्या देशात राजकीय माफिया फोफावत आहेत." यापूर्वी जीतू पटवारी यांनी भाजपावर अक्षय बम यांना घाबरवणे, धमकावणे आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती यांनी आधी अर्ज मागे घेतला आणि नंतर कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेऊन भाजपामध्ये प्रवेश केला.