हिमाचल प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यातील निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक होताना दिसत आहे. या निवडणुकीत एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
करसोग येथील जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौत म्हणाली की, काँग्रेसच्या काळ्या कृत्यांबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण काँग्रेस निवडणुकीत हरत आहे. प्रतिभा सिंह यांनी कंगनाला 'हुस्न परी' म्हटल्यानंतर अभिनेत्रीने पलटवार केला आहे.
विक्रमादित्य सिंह यांना पुन्हा एकदा राजपुत्र म्हणून संबोधताना कंगनाने सांगितलं की, "ते आपल्या पत्नीसोबतही चांगलं वागत नाही. कदाचित त्यांना महिलांचा आदर कसा करावा हे माहीत नसेल. छळ करण्यात आल्याचं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. मी प्रतिभा सिंह य़ांना माझ्या आईसारखं मानते. कंगनाला पाहण्यासाठी जमणारी गर्दी मतदान करणार नाही, असंही त्यांनी जाहीर सभेत सांगितल. ती काय आहे हे पाहण्यासाठीच गर्दी येते असं त्या म्हणाल्या."
"मी काही वस्तू नाही. मी पण इतर आई-बहिणींसारखी हाडामासाची बनलेली आहे. जसं लहान मुली आजकाल हिमाचल प्रदेशच्या गल्लीमध्ये खेळतात. तसंच मीही हिमाचल प्रदेशच्या गल्लीमध्ये खेळायची. त्या इतर बहिणी वस्तू पाहण्यासाठी नाही. तर आपल्या बहिणीला पाहण्यासाठी येतात" असं म्हणत कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे.
"हिमाचलचे भाऊ वस्तू पाहण्यासाठी किंवा हुस्न परी पाहण्यासाठी येत नाहीत तर हिमाचलच्या मुलीला पाहायला येतात. 95 टक्के लोकांनी तिचा चित्रपट देखील पाहिला नाही, परंतु तरीही त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान आहे. आपल्या मुलीला पाहण्यासाठी लोक इथे येतात. कोणत्या वस्तूला पाहण्यासाठी येत नाहीत. त्यांनाही एक मुलगी आहे आणि मुलीबद्दल असं विधान करणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे" असंही कंगना राणौतने म्हटलं आहे.