तिरुवअनंतपुरम : अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला किमान २०० लोकसभा जागा जिंकण्याचे आव्हान दिले. तसेच त्यांनी राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी देणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
येथून पक्षाच्या उमेदवार असलेल्या महुआ मोईत्रा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, ‘भाजप ४०० पार’ म्हणत आहे, मी त्यांना आधी २०० जागा ओलांडण्याचे आव्हान देते. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी २०० पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु त्यांना ७७ वर थांबावे लागले. या ७७ आमदारांपैकी काहीजण तेव्हापासून आमच्यात सामील झाले आहेत.
‘सीएए हा सापळा’‘सीएए हा कायदेशीर नागरिकांना परदेशी बनवण्याचा सापळा आहे. एकदा तुम्ही सीएए लागू केल्यानंतर, एनआरसी होईल. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए किंवा एनआरसीला परवानगी देणार नाही. केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. तुम्ही अर्ज केल्यास, तुम्हाला ५ वर्षांसाठी परदेशी म्हणून घोषित केले जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.