नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजने केंद्रात दोनदा सरकार स्थापन केले असून तिसऱ्यांदाही सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींची जादू अजूनही कायम असून भाजपप्रणित एनडीए आघाडीला पुन्हा बहुमत मिळू शकते, असे काही सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मात्र राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशी परिस्थिती दिसत नाही.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हेच दाखवतात. यंदा भाजपने कर्नाटकसारखे राज्य गमावले. तर डिसेंबर 2022 मध्ये हिमाचल प्रदेशातही भाजपचा पराभव झाला होता. आतापर्यंत या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता होती. या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. कर्नाटकात काँग्रेसने 224 पैकी 136 जागा जिंकल्या होत्या. भाजप 104 वरून 65 वर घसरला. याशिवाय, विविध राज्यांमध्ये झालेल्या अनेक पोटनिवडणुकांमध्येही भाजपला पराभवाची चव चाखावी लागली आहे.
याचबरोबर, यंदा अनेक ठिकाणी सत्ता वाचवण्यातही भाजपला यश आले. मार्चमध्ये ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि तिन्ही राज्यांमध्ये पक्षाला आपले सरकार वाचवण्यात यश आले. त्रिपुरामध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर परतला आणि नागालँडमध्ये एनडीपीपी आणि मेघालयमध्ये सत्ताधारी एनपीपीसोबत युती केली.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी गुजरातमध्ये भाजपने विजय मिळाला, तर हिमाचल प्रदेशात पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय, देशातील इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर आता एकूण 15 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. देशातील या राज्यांमध्ये जवळपास 44.35 टक्के लोकसंख्या आहे. त्याचबरोबर काँग्रेस आता 7 राज्यांमध्ये सरकार चालवत आहे. या राज्यांमध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 30.94 टक्के लोक राहतात.