काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे असलेल्या २० कोटी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये ४ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याचाही समावेश आहे. मात्र एवढी संपत्ती असली तरी राहुल गांधींकडे राहण्यासाठी स्वत:चं घर नाही. तसेच त्यांच्याकडे स्वत:ची कारही नाही.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे ९ कोटी २४ लाख ५९ हजार २६४ रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्याकडे १११ कोटी १५ लाख २ हजार ५९८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामधील ९ कोटी ४ लाख ८९ हजार रुपयांची मालमत्ता त्यांनी स्वत: खरेदी केली आहे. तर २ कोटी १० लाख १३ हजार ५९८ रुपयांची संपत्ती त्यांना वारसा हक्काने मिळाली आहे.
शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामधील ट्रिनिटी कॉलेजमधून एम फील ही पदवी मिळवली आहे. त्याशिवाय रोलिंग कॉलेज फ्लोरिडा येथून त्यांनी आर्ट्स विषयातून पदवी मिळवली आहे. तसेच राहुल गांधींविरोधात देशभरात विविध राज्यात १८ गुन्हे दाखल आहे. मात्र इतर कुठला गुन्हा दाखल नसल्याचेही राहुल गांधी यांनी या शपथपत्रात म्हटले आहे.
तसेच मोदी समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने कलम ४९९ आणि ५०० अन्वये दोषी ठरवले आहे, त्यासाठी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी शपथपत्रात केला आहे. त्याबरोबरच या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. सध्या हे प्रकरण न्याप्रविष्ट आहे, असेही राहुल गांधी यांनी या शपथपत्रात म्हटले आहे.