पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देश आणि लोकशाहीला जेलमध्ये बदलण्याचं काम करत असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. ईडी आणि सीबीआय यांसारख्या एजन्सी सरकारच्या खिशात असल्याचा दावा ममतांनी केला. पक्षाच्या नेत्यांना अटक झाल्यास त्यांच्या पत्नी रस्त्यावर उतरतील, असा इशारा तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले आणि म्हणाले की, 4 जूननंतर भ्रष्टाचारावर कठोर कारवाई केली जाईल. पण, निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात पाठवायचे, असा त्यांचा अर्थ आहे. पंतप्रधानांनी असं बोललं पाहिजे का? निवडणुकीनंतर भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असं जर मी म्हणाले तर..., पण मी असं म्हणणार नाही, कारण लोकशाहीत अशा गोष्टी मान्य नाहीत.
ईडी-सीबीआयवरून भाजपावर टीकास्त्र
पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे लोकांना संबोधित करताना ममता यांनी भाजपा संपूर्ण देशाला तुरुंगात बदलत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अटक केलेल्या टीएमसी नेत्यांच्या पत्नींना त्यांच्या पतीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्यास सांगितलं. "लोकांना निवडकपणे अटक केली जात आहे. प्रत्येकाला तुरुंगात पाठवले जात आहे. भाजपा देश आणि लोकशाहीला जेलमध्ये बदलत आहे."
"भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही"
"तुमच्या एका खिशात ईडी आणि सीबीआय आहे, तर दुसऱ्या खिशात एनआयए आणि आयकर विभाग आहे. एनआयए-सीबीआय भाजपाचे भाऊ आहेत, तर ईडी आणि आयकर हे भाजपाचे टॅक्स कलेक्शन फंडींग बॉक्स आहेत. तपास करणाऱ्या एजन्सी तुमचे सहकारी आहेत, त्या आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही" असं ममता यांनी म्हटलं आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरूनही ममतांनी केंद्रावर निशाणा साधला. "तुम्ही हेमंत सोरेन यांना अटक का केली? मी त्यांच्या पत्नीशी बोलले आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? आता त्यांना तुरुंगातून काम करावं लागत आहे. त्यांच्या अटकेने काही फरक पडणार नाही, कारण ते मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकतील" असं देखील ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.