पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांना वाटतं की देवाने त्यांना पाठवलं आहे. या विधानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खोचक टोला लगावला आहे. "जर पंतप्रधान मोदी खरोखरच देवाने पाठवल्याचा दावा करत असतील तर लोक त्यांच्यासाठी मंदिर बांधतील. पण अट अशी असेल की पंतप्रधान मोदींना देशाला त्रास देणं थांबवावं लागेल" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्तान लाइव्हच्या रिपोर्टनुसार, बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या की, "मोदी म्हणतात की त्यांचे जैविक पालक नाहीत. देवाने त्यांना पृथ्वीवर पाठवलं आहे. ते असंही म्हणत आहेत की 2047 पर्यंत ते देवाने पाठवलेला दूत म्हणून राहतील. जर ते खरोखर देव असतील तर ते चांगलं आहे. पण देव राजकारण करत नाहीत. ते लोकांबद्दल वाईट बोलत नाही किंवा दंगलीत त्यांना मारत नाही. खोटंही बोलत नाही."
"मंदिर बांधण्यासाठी जागा देऊ"
"मी तुम्हाला एक जागा देईन जेणेकरून तुम्ही मंदिर बांधू शकाल आणि तुमचा फोटो ठेवू शकाल. आम्ही तुळशीची पाने देखील अर्पण करू आणि अगरबत्ती लावू आणि पुजारी देखील नियुक्त करू. मिठाई आणि फुलं देखील देऊ. तुम्हाला ढोकळा आणि खिचडी देऊ म्हणजे तुम्ही तिथेच बसाल. कृपया भारताला त्रास देणं बंद करा. तुमच्या खोटं बोलण्याला देखील एक मर्यादा असायला हवी."
काय म्हणाले पीएम मोदी?
मोदींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना वाटतं की देवाने त्यांना कोणत्यातरी उद्देशाने पाठवलं आहे, त्यामुळे तो उद्देश पूर्ण होईपर्यंत ते काम करत राहतील. ते म्हणाले, "माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला मी बायोलॉजिकली जन्माला आल्याचं जाणवत होतं. तिच्या मृत्यूनंतर तुम्हा सर्वांच्या अनुभवांमुळे मला देवाने पाठवलं आहे, असं वाटतं." दुसऱ्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, "काही लोक मला क्रेझी म्हणतील, पण मला वाटतं की देवाने मला कोणत्यातरी उद्देशाने पाठवलं आहे. तो उद्देश पूर्ण होताच माझं कामही संपेल."