ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:45 PM2024-03-12T15:45:44+5:302024-03-12T15:46:26+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे.
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील मतभेद अद्यापही संपताना दिसत नाहीत. तृणमूल काँग्रेसपश्चिम बंगालनंतर आता मेघालयच्या तुरा लोकसभा जागेसाठी आणि आसाममधील जागांसाठी लवकरच आपले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. लवकरच तिकीटाचीही घोषणा होईल, असा दावा केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे.
टीएमसीकडून मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने यापूर्वीच ए. संगमा यांना येथून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आघाडी व्हावी यासाठी तुरा मतदारसंघ तृणमूलला देण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ शकली नाही.
2019 मध्ये असा होता निकाल -
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, मुकुल संगमा काँग्रेसमध्ये होते, त्यांना तुरा मतदार संघातून 41.24 टक्के मते मिळवली होती. मात्र, एनपीपीच्या अगाथा संगमा यांच्याकडून त्यांचा 64 हजार मतांनी पराभव झाला होता. यानंतर मुकुल संगमा काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये दाखल झाले होते.
TMC मेघालयातील शिलाँग मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही -
TMC सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मेघालयात उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. मात्र, पक्षाने शिलाँगमधून निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या काँग्रेसचे व्हिन्सेंट एच पाला हे येथील विद्यमान खासदार आहेत. याशिवाय TMC आसाममध्येही 2-4 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून राज्यातील नेते यासंदर्भात निर्णय घेतील, असेही सूत्रांनी म्हटले आहे.