लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. शनिवारी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपाच्या लोकसभा उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने विरोधकांवर निशाणा साधला. अनुचित टिप्पणी करणाऱ्या आणि राज्यातील महिलांचा अपमान करणाऱ्या 'शेहजादां'च्या टोळीला जनता धडा शिकवेल, असे कंगना राणौत म्हणाली. मंडी लोकसभा मतदारसंघातील झाकरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौतने विरोधी उमेदवार आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांच्यावर निशाणा साधला.
"आता ते (विक्रमादित्य सिंह) म्हणत आहेत की, मी अपवित्र आहे, कारण मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर इथे आले आहे. मी आधी जाऊन स्वतःला शुद्ध करायला हवे. त्यांनी केलेले विधान अपमानास्पद वाटले, कारण चित्रपटांमध्ये काम करून मी माझ्या कुटुंबाला आधार दिला, माझ्या भावा-बहिणींना शिक्षण दिले, ॲसिड हल्ला पीडित बहिणीवर उपचार केले आणि राज्याचा अभिमान वाढवला", असे कंगना राणौत म्हणाली.
याचबरोबर, अयोग्य कमेंट करणाऱ्या आणि राज्यातील महिलांचा अपमान करणाऱ्या 'शेहजादां'च्या टोळीला तेथील लोक धडा शिकवतील, असे कंगना म्हणाली. तसेच, विक्रमादित्य सिंह पैशाच्या जोरावर निवडणुकीत उतरले आहेत. तर पीएम मोदींचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि वाढताना त्यांनी आईला संघर्ष करताना पाहिले. त्यामुळेच त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण दिल्याचा दावा कंगना राणौतने केला आहे.
दरम्यान, विक्रमादित्य सिंह यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला होता. कंगना राणौत उल्लेख करत विक्रमादित्य सिंह म्हणाले होते की, "मी प्रभू रामाकडे प्रार्थना करतो की तिला बुद्धी द्यावी आणि ती 'देवभूमी' हिमाचलमधून स्वतःला शुद्ध करेल आणि बॉलिवूडमध्ये परत जाईल, अशी आशा आहे. कारण ती निवडणूक जिंकणार नाही आणि याचे कारण तिला हिमाचलच्या लोकांबद्दल काहीच माहिती नाही."