लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपा उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौतनेकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांना कदाचित लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असं म्हणत पलटवार केला आहे.
राहुल गांधी सतत देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असं म्हणतात. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं असा प्रश्न कंगनाला पत्रकारांनी विचारला. त्यावर कंगना राणौत म्हणाली की, "जर लोकशाहीची हत्या होत आहे, तर आपण कशाची तयारी करतोय? लोकांची मन जिंकणं, लोकांकडून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणं, लोकांना आपण सहकार्य करणं, त्यांचा तुमच्यावर विश्वास असणं."
"प्रेम असणं, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असणं ही लोकशाहीची हत्या आहे का? हीच लोकशाही आहे. कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही." भाजपा हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागा जिंकेल आणि आगामी निवडणुकीत '400 पार' करण्याचं लक्ष्य गाठेल असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. ती सध्या कार्यकर्त्यांना भेटत आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी कंगना राणौत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून भाजपाने उमेदवारी दिली आहे. कंगनाने शुक्रवारी रोड शो आणि रॅलीने आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. राहुल गांधींना प्रत्युत्तर दिल्याचा तिचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे.