मिशन लोकसभा; बिहारसाठी BJP चा फॉर्म्युला ठरला, चिराग-मांझी यांना मिळतील इतक्या जागा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 04:20 PM2023-08-18T16:20:15+5:302023-08-18T16:20:15+5:30
Lok Sabha Election 2024: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू आहे. सध्या विविध पक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत.
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात सर्व 80 जागा जिंकण्याचा दावा करणार्या भाजपने बिहारमधील लोकसभेच्या किमान 35 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे निकालाची पुनरावृत्ती व्हावी, या हेतूने भाजपने यंदाही जागावाटपावर भर दिला आहे.
30 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजप 40 पैकी 30 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांना गेल्या वेळेप्रमाणे यंदाही 6 जागा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय भाजपने मित्रपक्षांसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे.
विरोधी खासदारांना भाजपात आणणार
उपेंद्र कुशवाह यांना दोन आणि जीतन राम मांझी यांना एक जागा देण्याची तयारीही भाजपने केली आहे. भाजप जेडीयूमधील अनेक विद्यमान खासदारांना आपल्या गोटात आणण्यासाठीही काम करत असल्याची माहिती आहे. भाजप जेडीयूच्या 5 ते 6 खासदारांच्या संपर्कात असल्याचे मानले जात आहे.
गेल्या वेळी भाजपने 39 जागा जिंकल्या
भाजपने गेल्यावेळी जेडीयू आणि एलजेपीसोबत निवडणूक लढवली होती. भाजप जेडीयूने 17-17 आणि एलजेपीने सहा जागा लढवल्या. दुसरीकडे, एक जागा वगळता उर्वरित सर्व 39 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी भाजप आपल्या काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापू शकते. यासोबतच भाजपच्या काही विद्यमान खासदारांच्या जागाही बदलल्या जाऊ शकतात. गरज पडल्यास अन्य पक्षाचे नेतेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.