Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. नुकतीच दिल्लीत एनडीएची बैठक संपली, यात नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला समर्थनाची पत्रे दिली आहेत. म्हणजेच, नितीश आणि चंद्राबाबू यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.
एनडीएच्या हे नेते उपस्थित आज, (दि.5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. तसेच, लोकसभा भंग करण्याची विनंती केली. यानंतर सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी NDA ची तासाभरात बैठक झाली. या बैठकीत नितीश आणि चंद्राबाबू यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी, जीतन राम माझी, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्लपटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यामुळेच आता त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. विशेष म्हणजे, जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत. या निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 ने कमी आहे. तर, टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण 28 जागा आहेत. भाजपच्या इतर मित्रपक्षांसोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करेल.
एकनाथ शिंदे यांनीदेखील पाठिंबा जाहीर केलाया बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनीदेखील नरेंद्र मोदी यांना समर्थन असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पोस्ट करताना शिंदेंनी लिहिले की, 'लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदीजी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम प्रमाणेच शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे सांगत जाहीर पाठींबा दिला,' असे ते म्हणाले.