Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्यांतील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आज(दि.29) त्यांनी कर्नाटकातील कर्नाटकातील बागलकोट येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
60 वर्षात काँग्रेसने काय केले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इतिहास सांगतो की, काँग्रेसने देशाचं वाटोळं केलंय. जेव्हा-जेव्हा काँग्रेस सत्तेत आली, तेव्हा देशाचा विनाश झालाय. हे लोक पुन्हा आले तर तुमची मुले उपाशी मरतील. कर्नाटकात काँग्रेस सरकार चालवत नाही, तर खंडणीखोर टोळी चालवत आहे. त्यांचा उद्देश फक्त तिजोरी भरणे, एवढाच आहे. गेल्या 10 वर्षात, काँग्रेसने गरिबीचे जीवन जगण्यास भाग पाडलेल्या प्रत्येक वर्गाच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो. आज हे लोक एका झटक्यात गरिबी हटवण्याचा दावा करतात, पण त्यांचा 60 वर्षांचा काळ पुरावा आहे की, यांनी देशातील गरिबांसाठी काहीही केलं नाही.
भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल
2024 च्या निवडणुका भारताचे भविष्य ठरवतील. विकसित भारत, स्वावलंबी भारत निर्माण करणे आणि देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे, हे या निवडणुकांचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसवाले म्हणतात की, भाजपने दलित-वंचितांसाठी काही केले नाही. पण, आज सर्वाधिक ST खासदार भाजपचे आहेत. आता तुमचे मतंच आम्हाला बळ देईल आणि हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब आणि स्किल हब बनवण्याचा आमचा संकल्प आहे. तुमच्या मतांमुळे हे शक्य होईल, असे आवाहनदेखील मोदींनी यावेळी केली.
काँग्रेसचे अल्पसंख्याकांना खूश करण्याचे प्रयत्नपीएम मोदी म्हणाले की, काँग्रेस अल्पसंख्याकांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण एससी/एसटी आणि ओबीसी समुदाय आता भाजपसोबत आहेत. कर्नाटकात काँग्रेसने घटना बदलून एससी-एसटी आणि ओबीसींचे अधिकार काढून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. आपल्या राज्यघटनेला धर्मावर आधारित आरक्षण मान्य नाही, पण कर्नाटक सरकारने मुस्लिमांना ओबीसी आरक्षणाचा एक भाग दिला. काँग्रेसने यापूर्वीही आपल्या जाहीरनाम्यात धर्मावर आधारित आरक्षणाचा मुद्दा माडंला होता, आता परत काँग्रेसला तेच आणायचे आहे.
काँग्रेसचे मनसुबे मी पूर्ण होऊ देणार नाहीसंसदेतील बहुतांश एससी, एसटी आणि ओबीसी खासदार भाजपचे आहेत आणि त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी भाजपसोबत असल्याचे काँग्रेसला वाटते. आता अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना एससी, एसटी आणि ओबीसींना लुटायचे आहे, पण मी हे होऊ देणार नाही. मी माझ्या दलित, आदिवासी आणि ओबीसी बंधू-भगिनींना हमी देतो की, मी काँग्रेसचे असे हेतू यशस्वी होऊ देणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.