मध्य प्रदेशातील बालाघाट येथील काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे या निवडणुकीमुळे पतीपासून लांब होण्याच्या मार्गावर आहेत. बालाघाट मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी खासदार कंकर मुंजारे यांनी पत्नी अनुभा यांना 19 एप्रिलपर्यंत एकाच घरात राहणं शक्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. पत्नीने घर सोडावं अन्यथा आपण घर सोडू, असा अल्टिमेटम कंकर मुंजारे यांनी पत्नीला दिला आहे.
बसपाचे उमेदवार कंकर मुंजारे आणि काँग्रेसच्या आमदार अनुभा मुंजारे यांच्यातील वैचारिक लढाई घराघरात पोहोचली आहे. बालाघाटच्या आमदार अनुभा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत फरक असल्याने त्यांचे पती कंकर मुंजारे यांनी त्यांना 19 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत वेगळं राहण्यास सांगितलं आहे. एका छताखाली राहिलो तर त्यात काहीतरी 'मॅच फिक्सिंग' आहे, असा लोकांना वाटेल असं कंकर मुंजारे यांनी म्हटलं आहे.
बसपाचे उमेदवार कंकर मुंढरे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, मी माझ्या पत्नीला आज घर सोडण्यास सांगितलं आहे, अन्यथा मी घर सोडेन. निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन लोक एकाच घरात राहू शकत नाहीत. असं केलं तर लोकांना वाटेल की हे एक प्रकारचं निवडणूक फिक्सिंग चालू आहे. 19 एप्रिलनंतर दोघेही पुन्हा एकाच छताखाली राहायला लागू.
निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या आमदार अनुभा मुंजारे यांनी काँग्रेसचे बालाघाट लोकसभा उमेदवार सम्राट सारस्वत यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं असलं तरी प्रचारादरम्यान पती कंकर मुंजारे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही यावर त्यांनी भर दिला. बालाघाटमध्ये भाजपाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करणे हे त्यांचं ध्येय आहे. "आमच्या लग्नाला 33 वर्षे झाली आहेत आणि एका छताखाली आमच्या मुलासह आनंदाने राहत आहोत. आमचे कुटुंब असे आहे की वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचा भाग असूनही आम्ही एकत्र आहोत" असं अनुभा यांनी म्हटलं आहे.
कंकर मुंजारे हे बालाघाटमध्ये अतिशय लढाऊ आणि प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांनी एकदा या जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून खासदारकीची निवडणूक जिंकली होती. याशिवाय ते तीनवेळा आमदार झाले आहेत. या निवडणुकीत मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपाने बालाघाट लोकसभा मतदारसंघासाठी कंकर मुंजारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पत्नी अनुभा मुंजारे या बालाघाट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार आहेत.