पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर कर्नाटक भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय हा देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी घ्यायला हवा होता, पण त्यांनी तसं केलं नाही, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसवर अनेक सवाल देखील उपस्थित केले
"काँग्रेसने राममंदिराचे निमंत्रण नाकारले, परंतु अन्सारी कुटुंबाने यासाठी न्यायालयात पिढ्यानपिढ्या लढा दिला आणि सांगितलं की येथे बाबरी मशीद होती, राम मंदिर नाही. परंतु ज्या दिवशी न्यायालयाचा निर्णय आला... ते म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे आणि अन्सारी यांनी मुस्लिम असूनही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग घेतला... हा नेमका फरक असतो."
"या देशाला विकास हवा आहे आणि वारसाही हवा आहे. आपल्या पूर्वजांनी अयोध्येत रामासाठी 500 वर्षे लढा दिला, लाखो लोकांचा मृत्यू झाला. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशीच घ्यायला हवा होता, पण त्यांनी तसं केलं नाही. हे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते. तेव्हाच 500 वर्षांचं स्वप्न पूर्ण होतं, 500 वर्षांची प्रतीक्षा संपते" असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.
"भाजपा सरकारने आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार केला आहे. आम्ही आयुष मंत्रालय तयार केले आहे. आमच्या सरकारमध्ये मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले. काँग्रेस तुमच्या मुलींचं रक्षण करू शकतं का? त्यांना माहीत आहे की, व्होटबँकेची भुकेली जनताच त्यांना वाचवेल, त्यामुळेच ते असं पाप करण्याचं धाडस करतात. 2014 पूर्वी आपल्या देशातील वर्तमानपत्रांमध्ये स्फोटांच्या बातम्या असायच्या. 2014 नंतर देशात बॉम्बस्फोटांच्या बातम्या कमी झाल्या" असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.