Narendra Modi : "घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर..."; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:17 PM2024-04-16T12:17:07+5:302024-04-16T12:28:44+5:30
Lok Sabha Election 2024 Narendra Modi : विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, "आरजेडी आणि काँग्रेसने आपले राजकीय हित साधले. एनडीएने मागासलेल्या लोकांना सन्मानाचे जीवन दिले आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये पोहोचले असून, त्यांनी गयामध्ये एका सभेला संबोधित केलं. गयामध्ये मंचावर पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, "आरजेडी आणि काँग्रेसने आपले राजकीय हित साधले. एनडीएने मागासलेल्या लोकांना सन्मानाचे जीवन दिले आहे. मोदींचं गॅरंटी कार्ड हे पुढील पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलं आहे. गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार, ही मोदींची गॅरंटी. 70 वर्षांवरील लोकांना मोफत उपचार ही मोदींची गॅरंटी आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात विकासाचा रोडमॅप देण्यात आला आहे."
"काँग्रेस सत्तेत असताना महिला बचत गटांना 150 कोटी रुपयांपेक्षा कमी निधी दिला जात होता. एनडीए सरकारच्या 10 वर्षात या महिला गटांना 40 हजार कोटींहून अधिक निधी देण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षात देशात अशी क्रांती झाली आहे, ज्याची फारशी चर्चा होत नाही. ही क्रांती देशातील महिला बचत गटांनी केली आहे. गेल्या 10 वर्षात 10 कोटी महिला स्वयंसहाय्यता गटांमध्ये सामील झाल्या आहेत, एकट्या बिहारमध्ये 1.25 कोटी महिला या गटांशी संबंधित आहेत."
#WATCH | Gaya, Bihar: Prime Minister Narendra Modi says, "For the next five years, Modi's 'guarantee card' has been updated. Three crore houses will be made for the poor, the poor will get free ration for the next five years, those above 70 years of age will receive free… pic.twitter.com/iZ77bBWN39
— ANI (@ANI) April 16, 2024
"आता मोदींचे गॅरंटी कार्ड पुढील 5 वर्षांसाठी अपडेट करण्यात आले आहे. गरिबांसाठी 3 कोटी कायमस्वरूपी घरे बांधणार, ही मोदींची गॅरंटी. गरिबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळेल, ही मोदींची गॅरंटी. 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्धाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील, ही मोदींची गॅरंटी. किसान सन्मान निधी भविष्यातही सुरू राहील, ही मोदींची गॅरंटी आहे."
"तुमच्या या सेवकाने 25 कोटी देशवासीयांना गरिबीतून बाहेर काढले आहे. अनेक दशकांपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गरिबांना अन्न आणि घराची स्वप्ने दाखवली. पण, एनडीए सरकारने 4 कोटी गरीबांना कायमस्वरूपी घरे दिली. याशिवाय तुमच्या आशीर्वादाने मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. देशाच्या घटनेने मोदींना हे पद दिले आहे. डॉ.राजेंद्र बाबू आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना नसती तर गरीब मुलगा कधीच देशाचा पंतप्रधान होऊ शकला नसता."
"काँग्रेसचे युवराज उघडपणे म्हणतात की ते हिंदू धर्माची शक्ती नष्ट करतील. त्यांचे इतर मित्र आमच्या सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया म्हणतात. उद्या रामनवमीचा पवित्र सण आहे. अयोध्येत उद्या सूर्यकिरणे रामललावर विशेष अभिषेक करणार आहेत. पण, घमंडीया आघाडीच्या लोकांना राम मंदिराची अडचण आहे. एकेकाळी प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारे आज राम मंदिरावर वेगवेगळ्या भाषेत बोलत आहेत. एका समाजाला खूश करण्यासाठी या लोकांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला" असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.