पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील सभेत बोलत असताना अचानक शांत झाले. त्यांचे डोळे पाणावले. भावना दाटून आल्या. मोदी थोडा वेळ गप्प राहिले. काहीतरी विचार करत होते, मग पाणी प्यायले. नरेंद्र मोदी भावूक झाले होते. कारण यावेळी पंतप्रधानांना भाजपाच्या एका नेत्याची आठवण झाली, ज्याची हत्या करण्यात आली होती.
मोदी म्हणाले, "आज मी सेलममध्ये आलो आहे, तेव्हा ऑडिटर रमेश याची आठवण येणं स्वाभाविक आहे. दुर्दैवाने आज सेलमचा माझा रमेश आपल्यात नाही. पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा रमेश आमचा मित्र होता. तो चांगला प्रवक्ता होता मात्र त्याची हत्या झाली. मी आज त्याला श्रद्धांजली अर्पण करतो."
सभेसाठी आलेले लोकही ऑडिटर रमेश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले. त्यांच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तामिळनाडूमध्येभाजपाचे प्रदेश महासचिव असलेल्या ऑडिटर व्ही. रमेश यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. हे 11 वर्षांपूर्वी 2013 मध्ये घडलं होतं.
सेलम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा रमेश पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आटोपून घरी परतले होते. हल्लेखोर आधीच त्यांच्या घराच्या परिसरात लपून बसले होते. ते आलेले पाहताच हल्ला केला. यामध्ये त्यांच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुरक्षा मागितली होती पण ती पुरवली गेली नाही, असा आरोप पोलिसांवर करण्यात आला. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष पी. राधाकृष्णन यांनी हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जात असून सरकार ते गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले होते. काही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले मात्र ते खरे हल्लेखोर नसल्याचे भाजपा नेत्याने सांगितले होते.