पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसचं सरकार कमकुवत असल्याचं म्हटलं आहे. एकेकाळी पाकिस्तान भारताच्या डोक्यावर नाचायचा. पण मोदींनी ठरवलं की, भारत आता घरात घुसून मारणार, आज बघा त्याची काय अवस्था झाली आहे. काँग्रेस आपल्या राजवटीत जगाकडे मदत मागायची. देशात भाजपाचे सरकार येणार हे निश्चित असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, "काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी खूप खोटं बोलली. पहिल्या कॅबिनेटमध्ये काहीही झालं नाही. काँग्रेसने शेणाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. तेही दिले नाही. घाबरू नका, हे फार काळ टिकणार नाहीत. तुमचा विश्वासघात करणाऱ्या दिल्लीच्या राजघराण्याने आता तोंडही दाखवलेलं नाही."
"हिमाचल प्रदेश हे सीमेला लागून असलेले राज्य आहे. हिमाचलच्या लोकांना मजबूत आणि शक्तिशाली सरकारचा अर्थ माहीत आहे. मोदी तुमच्यासाठी जीव धोक्यात घालतील, पण तुम्हाला कधीही त्रास होऊ देणार नाहीत. मला विकसित भारतासाठी, विकसित हिमाचलसाठी आशीर्वाद हवे आहेत. देशात पाच टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. देशात भाजपाचे सरकार येणार हे निश्चित आहे. भाजपा 4-0 ने हॅट्ट्रिक करेल."
पाकिस्तानचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. "तुम्ही काँग्रेसचा काळ पाहिला आहे. जेव्हा देशात कमकुवत सरकार होतं. त्यावेळी पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचायचा. कमकुवत काँग्रेस सरकार जगभर विनवणी करत फिरत असे. मोदींनी म्हटल्याप्रमाणे भारत यापुढे जगाकडे भीक मागणार नाही, भारत स्वतःची लढाई स्वबळावर लढेल आणि भारत त्यांना घरात घुसून मारेल. त्यानंतर आता त्यांची अवस्था पाहा."
"भारत मातेचा अपमान मी सहन करू शकत नाही, पण काँग्रेस भारत मातेचा अपमान करणंही सोडत नाही. काँग्रेसला भारत माता की जय म्हणण्यात अडचण आहे. त्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण आहे. अशी काँग्रेस हिमाचलचं कधीही भलं करू शकत नाही. सीमावर्ती राज्यात जेव्हा रस्ते बांधायचे तेव्हा रस्ता बांधला तर त्या रस्त्यावरून शत्रू आत येतील, अशी भीती काँग्रेसला होती. अशी विचारसरणी मोदींच्या स्वभावाशी जुळत नाही" असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.