ओडिशातील बेहरामपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपा जे बोलते, ते करून दाखवते, येथे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्व घोषणा पूर्ण ताकदीने लागू करू. यावेळी ओडिशात एकाच वेळी दोन यज्ञ होत आहेत. एक यज्ञ म्हणजे देशात, हिंदुस्थानात मजबूत सरकार स्थापन करणं. आणि दुसरा यज्ञ म्हणजे ओडिशामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एक मजबूत राज्य सरकार स्थापन करणं. 13 मे रोजी येथे मतदान होत आहे.
"आज मी ओडिशा भाजपाचे खूप खूप अभिनंदन करतो. ओडिशाच्या आकांक्षा, येथील तरुणांची स्वप्नं आणि येथील बहिणी आणि मुलींची क्षमता लक्षात घेऊन, ओडिशा भाजपाने खूप काम केलं आहे. आम्ही एक व्हिजनरी संकल्पपत्र जारी केलं आहे, आम्ही जे काही बोलू, ते आम्ही पूर्ण ताकदीने लागू करू, ही मोदींची गॅरंटी आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
"येथील बीजू जनता दल (बीजेडी) सरकारची 4 जून ही मुदत संपली आहे. आज 6 मे आहे, भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार 6 जून रोजी निश्चित होईल. 10 जून रोजी भुवनेश्वरमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मी आज सर्वांना भाजपा सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. ओडिशामध्ये बीजेडीचा अस्त होत आहे आणि भाजपा आश्वस्त आहे. फक्त भाजपाच आशेचा नवा सूर्य होऊन आली आहे" असंही मोदींनी सांगितलं.
ओडिशातील भ्रष्टाचाराचा संदर्भ देत मोदी म्हणाले, "ओडिशात बीजेडीचे छोटे छोटे नेतेही मोठ्या बंगल्यांचे मालक झाले आहेत. तरी असं का? इथे डॉक्टरांच्या अनेक जागा रिक्त आहेत... तरी असं का? विद्यार्थी आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करत नाही... तरी असं का? जर मोदींनी ओडिशाच्या विकासासाठी पुरेसा निधा दिली आहे... तरी असं का? केंद्र सरकारने जलजीवन मिशनसाठी दहा हजार कोटी रुपये ओडिशाला दिले. ते पैसे इथल्या सरकारने योग्य पद्धतीने खर्च केले नाही. मोदींनी गावातील रस्ते तयार करण्यासाठी पैसे पाठवले पण तरी येथील रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे. मोदी दिल्लीतून मोफत तांदूळ मिळावा म्हणून पैसे पाठवतात पण बीजेडी सरकार यावर आपले फोटो चिपकवतात."