लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावाती प्रचार सुरूच आहे. प्रचाराच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशातील धार येथे पोहोचले. मोदींनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करत हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडीच्या एका नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला आहे, ज्याला न्यायालयाने शिक्षा दिली आहे असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधत नरेंद्र मोदी म्हणाले की, "निर्लज्जपणा बघा, कोर्टाने त्यांना गुन्हेगार ठरवलं, तरीही ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी आता मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत म्हटलं आहे. मोदी गरीबाचा मुलगा आहेत आणि मोदींनी प्रत्येक गरीबाची गॅरंटी घेतली आहे."
"इंडिया आघाडी पराभव होणार असल्याने हताश आहे आणि म्हणूनच ते अफवा पसरवत आहेत की भाजपाला 400 जागा मिळाल्या तर मोदी संविधान बदलतील. काँग्रेसने आरक्षणावर डल्ला मारू नये यासाठी मोदींना 400 जागांची गरज आहे." पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील बेहरामपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना विरोधकांवर हल्लाबोल केला होता. भाजपा जे बोलते, ते करून दाखवते, येथे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्व घोषणा पूर्ण ताकदीने लागू करू. यावेळी ओडिशात एकाच वेळी दोन यज्ञ होत आहेत. एक यज्ञ म्हणजे देशात, हिंदुस्थानात मजबूत सरकार स्थापन करणं आणि दुसरा यज्ञ म्हणजे ओडिशामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एक मजबूत राज्य सरकार स्थापन करणं असं मोदींनी म्हटलं होतं.