देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूर्गापूरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केलं. पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले की, "मी आधीच सांगितलं होतं की, राहुल गांधी वायनाडमधून हरत आहेत आणि ते नवीन जागा शोधत आहेत. अमेठीतून लढणार असं काहीजण सांगत होते. पण ते इतके घाबरले आहेत की ते वायनाडमधून पळून रायबरेलीला पोहोचले आहेत."
"देशभरात फिरून ते घाबरू नका... घाबरू नका असं म्हणत आहेत. आज मी त्यांना हेच सांगत आहे की घाबरू नका... पळून जाऊ नका. मला हेही सांगायचं आहे की काँग्रेसच्या जागा पूर्वीपेक्षा कमी होणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत यंदा कमी जागांवर निवडणूक लढवली जात आहे. इंडिया आघाडी निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर देशाचे विभाजन करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानाचा वापर करत आहेत. ही आघाडी फक्त एका व्होट बँकेला समर्पित आहे."
"या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. कोणत्याही जनमताच्या सर्वेक्षणाची गरज नाही. त्यांच्या सर्वात मोठ्या नेत्या निवडणुकीला सामोरे जाणार नाहीत आणि पळून जातील, असं मी यापूर्वीही सांगितलं होतं. राजस्थानातून पळून राज्यसभेच्या मागच्या दाराने संसदेत पोहोचल्या. राजपुत्र वायनाडमध्येही निवडणूक हरणार आहेत आणि त्यामुळे ते दुसरी जागा शोधणार आहे. आता ते अमेठीत लढण्याची भीती बाळगून रायबरेलीला पळून गेले आहे. मला त्यांना सांगायचं आहे, घाबरू नका, पळून जाऊ नका" असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.
"आपण भारतातून प्रत्येकाची गरिबी दूर करू शकतो. म्हणूनच मी मेहनत घेत आहे. आमच्या गरीब बांधवांनी माझ्या मेहनतीला नवीन ताकद आणि नवे रंग दिले आहेत. ते माझ्यासोबत चालले आहेत. माझ्या यशात गरिबांचा मोठा वाटा आहे. तुम्हाला पाहिल्यावर जास्त मेहनत करावीशी वाटते असंही ते म्हणतात" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी म्हटलं आहे.