संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी संपला असून, कोणत्याही निवडणुकीच्या मुद्द्याशिवाय निवडणुकीचा प्रचार संपला आहे. राम मंदिर, कलम ३७०, सीएए, एनआरसी यासह कोणताही राष्ट्रीय मुद्दा या निवडणुकीत चालला नाही. पूर्ण निवडणूक ही संविधान संपविण्याबाबत आणि संविधान वाचविण्यावर झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिकची संपूर्ण मदार प्रदेशातील ८० आणि बिहारमधील ४० जागांवर आहे.
प्रचारादरम्यान मोदींनी २०६ सभा आणि रोड शो करून विक्रम केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीत न जाणे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली.
दोन राज्यांवर बरेच काही अवलंबून
- २०१९ च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या, तर येथे भाजपच्या जागा कमी होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
- २०१९ मध्ये बिहारमध्ये एनडीए युतीने राज्यातील सर्व ४० जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी १७ जागा भाजपने, १७ जदयू आणि ६ जागा लोक जनशक्ती पक्षाने जिंकल्या होत्या. मात्र या वेळी बिहारमध्ये भाजप आणि एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. या दोन राज्यांत भाजप किती जागा जिंकतो यावर बरेच काही अवलंबून आहे.
महाराष्ट्रातील नुकसान कुठे भरून काढणार?
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये होत असलेले नुकसान पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणामधून भरून काढण्याचा दावा भाजप करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये २०१९ मध्ये भाजपने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये भाजपने २०१९ मध्ये २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.