लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाधी दरम्यान, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा काँग्रेससमोरील अडचणी वाढवल्या आहेत. सॅम पित्रोदा यांनी ईशान्य भारताती लोक हे चिनी लोकांसारखे आणि दक्षिण भारतातील लोक हे आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, असं विधान केलं होतं. या विधानावरून भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विधानावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगाणामधील वारंगल येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी आज खूप संतप्त झालो आहे. काँग्रेसच्या युवराजांच्या एका काकांनी आज अशी शिवी दिली ज्यामुळे मला खूप राग आला आहे. राज्यघटनेला डोक्यावर घेणारी मंडळी देशाच्या कातडीचा अपमान करत आहे.
मोदी म्हणाले की, ज्या कातडीचा रंग काळा असतो, ते काय सगळे आफ्रिकेतले आहेत? माझ्या देशातील लोकांना त्यांच्या त्वचेच्या रंगावरून यांनी शिविगाळ केलीय. त्वचेचा रंग कुठलाही असो आम्ही श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. काँग्रेसच्या युवराजांना याचं उत्तर द्यावं लागेल. त्वचेच्या रंगाच्या आधारावर माझ्या देशवासीयांचा झालेला अपमान देश सहन करणार नाही आणि मोदी तर अजिबात सहन करणार नाही.
सॅम पित्रोदा म्हणाले होते की, भारतात आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या ७५ वर्षात प्रत्येकाला जगता येईल, असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भाऊ-बहिण आहेत," असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं होतं.